दुष्काळाच्या सावटाखाली पोळ्याचा सण कोरडा - कोरडाच

Foto
शेतकऱ्यांना पावसाची चिंता...

चिंताजनक स्थिती

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): लाडक्या सर्जा राजाचा पोळा सण बळीराजाने गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी जड अंतकरणाने कोरडा कोरडाच साजरा केला. बहुतांश भागांत अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप पीक वाया गेले आहे. रब्बीचीही आशा मावळली आहे. या पार्श्वभूमीवर श्रावणी बैलपोळा दुष्काळाच्या गडद सावटात कसाबसा साधेपणाने साजरा झाला.

बुधवारी खांदेमाळणी होती. या दिवशी देखील शेत शिवारांत ओढे, नदी तलावांत कुठे थेंबभरही पाणी नसल्यामुळे घरातूनच बादलीने पाणी ओतून सर्जा राजाला आंघोळ घालावी लागली. शेतात खरिपाची पिके जोमात नसल्यामुळे बळीराजा कोमात गेल्यागत भीषण स्थिती आहे, त्यामुळे पोळ्याच्या बाजारातही सगळीकडे निरुत्साह आणि शुकशुकाट दिसून आला.

शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सणांमध्ये श्रावणी पोळा हा महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा मात्र कोणताही बडेजाव न करता साधेपणानेच सर्जा-राजाला सजवून गावाच्या पंचक्रोशीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

 ग्रामदैवतांच्या मंदिरांना प्रदक्षिणा घालून घरा-घरांसमोर सर्जा-राजाची सुवासिनींनी पुरणपोळी नैवेद्य भरून मनोभावे पूजन केले. पूर्वीसारखे मारुती मंदिरांसमोरील वेशीतून मोठ्या प्रमाणावरील जल्लोषात वाजत-गाजत मानाचा बैल पुढे काढण्याची प्रथा हल्ली बंद पडल्यात जमा आहे. त्यामुळे होणारे भांडण तंटे मिटविण्यासाठी कुठे पोलिसांचा बंदोबस्तही दिसून आला नाही. दुष्काळाचे भीषण सावट असल्यामुळे गावोगावी अगदीच साधेपणाने पारंपरिक पोळासण साजरा करण्यात आला.

पीक पाण्याची स्थिती चांगली असल्यास पोळा सणाचा उत्साह गगनात मावेनासा होतो. पोळा आणि पाऊस झाला भोळा, ही म्हण यंदा खोटी ठरली असून, पोळा आणि पावसाचा कानाडोळा, अशी परिस्थिती यंदा उद्भवल्याने पोळा सणाचा उत्साह फारसा कोठे जाणवलाच नाही. सव्वा महिन्यापासून पाऊस गायब झाल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पूर्णतः करपली आहेत. सुमारे ७५ टक्के खरिपाचे पीक वाया गेल्याचे प्रगतशील शेतकरी वसंत जगताप, विष्णू कळसकर यांनी सांगितले.

बहुतांश भागात पावसाच्या दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा संपला असून, ऊस, कपाशी, तूर आदी पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिके उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यात असतानाच पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. हल्ली शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्याने बैलांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. आठ दहा बैलाची शेती असणाऱ्यांकडे अवधी एक बैलजोडी उरली आहे. काही गोरगरीब शेतकऱ्यांकडेही बैल असल्यामुळे त्यांनी आपापल्या कृतीप्रमाणे पोळासन साजरा करून आपल्या सर्जा राजांप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली, 

असे पैठण तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावसाहेब बोरुडे पाटील यांनी सांगितले. बैलांच्या सजावटीसाठी रंग, गोंडे, झूल, वेसण आणि घुंगरमाळांनी दुकाने सजली. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमुळे खरेदीचा उत्साह कमी होता, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जुनाच साज सर्जा राजाच्या अंगावर चढवून पोळासण साजरा केला.

पोळा सणाच्या दिवशी दिसली बळीराजाची बांधिलकी बळीराजांनी आपल्या लाडक्या बैलांची वेगवेगळी नावे पाठीवर लिहून त्याला रंगवले होते. शिंगांना फुगे बांधून अंगावर झूल पांघरली होती. शिंगे रंगविली... बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार... असा सारा थाट दुष्काळात का होईना पाहायला मिळाला. 

नद्या-महानद्या, ढवळ्या पवळ्या, धुळ्या-चपळ्या, हिरो, दुशिंग्या, लक्ष्या चिक्शा आदी नावे पाठिंवर लिहिल्याचे दिसून आले. दुष्काळाचे सावट असेनाका, मात्र आपल्या सर्जा राजाप्रति असलेली बळीराजाची बांधिलकी पोळा सणाच्या दिवशी दिसून आली, एवढे मात्र निश्चित.